मारुती रामचंद्र लामखडे तथा मा.रा. लामखडे (हल्ली मुक्काम केळेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर) यांचा जन्म 27 जुलै 1949 रोजी केळेवाडी येथे झाला. सध्या ते निवृत्त प्राध्यापक असून पूर्णवेळ शेतकरी आहेत. राष्ट्रसेवा दलाचा सैनिक आणि समाजवादी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून वयाच्या पंधराव्या वर्षापासून आजपर्यंत त्यांनी काम केले. प्राध्यापकाची नोकरी करतानाच विविध सामाजिक, सांस्कृतिक, वाङमयीन चळवळीत एक परिवर्तनवादी पुरोगामी कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. मेंढ्या वळणाऱ्या आई-वडिलांच्या शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यानंतर त्यांचे शिक्षण राजुरी येथे झाले. घरी शिक्षणाची परंपरा नव्हती तरी पहिल्या पिढीत एम.ए. मराठी, एम. फिल, बी.एड पर्यंत शिक्षण पूर्ण केले.शालेय शिक्षण पुणे जिल्ह्यातील राजुरी येथे आत्याच्या घरी राहून झाले, तर त्या पुढील शिक्षण संगमनेर कॉलेजमधून आणि नंतर पुणे विद्यापीठातून झाले. कमवा शिका च्या माध्यमातून त्यांनी स्वावलंबनाने उच्च शिक्षण घेतले.महाविद्यालयीन काळात विद्यार्थी चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून संगमनेर आणि नंतर पुणे विद्यापीठांमध्ये सक्रिय सहभाग होता. पुण्यात असताना शेतकरी शेतमजूर पंचायत या बा.ना. राजहंस अध्यक्ष असलेल्या समाजवादी संघटनेचा महाराष्ट्र कार्यालयामध्ये सेक्रेटरी म्हणून काम केले. या काळात समाजवादी चळवळीतील सर्वच आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. पुण्यात आणीबाणी विरोधी आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. दुर्वे नाना, बाबा आढाव,भाई वैद्य, ग प्र प्रधान, यदुनाथ थत्ते,आचार्य केळकर इत्यादींचा निकटचा सहवास लाभल्यामुळे प्रगल्भ सामाजिक जाणीव तयार झाली. शिक्षण घेताना व नंतर नोकरीच्या काळात प्राचार्य म. वि.कौंडिण्य यांची वेळोवेळी मदतही झाली आणि मार्गदर्शनही लाभले. एक वर्ष जुन्नर ला आणि नंतर संगमनेर महाविद्यालयामध्ये 1975 ते 2009 पर्यंत म्हणजे अगदी निवृत्तीपर्यंत प्राध्यापक म्हणून सेवा दिली. तर मराठी विभाग प्रमुख म्हणून 2009 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर गावी गेल्यावर शेतीकाम आणि लिखाण यात ते रमून गेले.1973 सालापासून बाबा आमटे आणि त्यांच्या आनंदवन,सोमनाथ , हेमलकसा प्रकल्पातील कामात सहभाग.याबाबत यदुनाथ थत्ते यांचे मार्गदर्शन मिळत गेले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आंतरभारती चळवळ ,भास्करराव दुर्वे प्रतिष्ठान,समता प्रतिष्ठान, लोक बिरादरी प्रकल्प, महात्मा फुले समता प्रतिष्ठान ,पुरोगामी साहित्य संसद, ग्रामीण साहित्य चळवळ ,दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, छात्र भारती विद्यार्थी संघटना , विडी मजदूर सभा इत्यादी संस्था संघटनांमध्ये त्यांनी काम केले पहिले. मराठी ग्रामीण साहित्य संमेलन बोटा येथे 1979 मध्ये भरविले आणि त्याचा संयोजक म्हणून काम पाहिले. प्राध्यापक मा.रा. लामखडे यांनी विविध प्रकारचे लेखन वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून केले आहे.आदिवासी ठाकर यांच्या लोकगीतांवरील संशोधन प्रबंध पुणे विद्यापीठाने मंजूर केला आहे .अनेक परिसंवाद, चर्चा सत्रे, व्याख्यानमाला यात त्यांनी नेहमी सहभाग नोंदवला आहे. व्याख्याता आणि वक्ता म्हणून त्यांची एक ओळख आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरील वीस पुस्तके प्रकाशित झालीत आणि लेखक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. प्रबोधनाच्या कामात अधिक रस असल्याने प्राध्यापक प्रबोधिनी चर्चक यासारखे उपक्रम त्यांनी अनेक वर्ष चालवले. सामाजिक, राजकीय आणि वांग्मयीन कार्यकर्ता म्हणून आणि मराठीचा व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्यांची या क्षेत्रात ओळख आहे. हजारो विद्यार्थी त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्यावर पुरोगामी विचारांचे संस्कार करता आले ही त्यांची खरी उपलब्धी.